
खुनाच्या आरोपाखाली आरोपीस 12 वर्षाची शिक्षा व 3000/- दंड
आरोपी तेजस सुर्यकांत सिरसाट रा. सिरसाटवाडी ता. अहमदपूर यास मा. एस. यु. वडगांवकर साहेब, अतिरीक्त सत्र न्यायाधिश-1 अहमदपूर यांनी आरोपीस 12 वर्षाची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 13/04/2023 रोजी मौजे किनगांव शिवारात मोहगावला जानारे रोड एका विटभटीच्या दक्षिणेस वामनराव वाहुळे यांचे शेताजवळ बांधावर एक अनोळखी व्यक्तीचे प्रेत रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसुन आले त्यावरून कोणीतरी खून केला अशी फिर्याद आरोपीचे विरुध्द दाखल केली. त्या फिर्यादीवरुन किनगांव पोलीसांनी तपास करून आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन किनगांव येथे गु.र.क. 84/2023 गुन्हा कलम 302, अन्वये नोंद करुन तपासिक अधिकारी बी.बी. खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन किनगाव यांनी योग्य तपास करुन अहमदपूर न्यायालयात वरील कलमान्वये दोषारोपपत्र दाखल केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 09 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासिक अधिकारी बी.बी. खंदारे व मयताला व आरोपीला एकत्र पाहणारा एक महत्त्वाचा साक्षीदारयांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. अतिरीक्त सत्र न्यायाधिश अहमदपूर एस.यु. वडगांवकर यांनी प्रकरणाच्या सुनावणी अंती सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला
परिस्थितीजन्य पुरावा ग्राहय धरुन आरोपी तेजस सुर्यकांत सिरसाट रा. सिरसाटवाडी यास 304 पार्ट 1 भा.दं. वि. चे कलमा खाली 12 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच 3000/ रुपये दंड आकारण्यात आला व दंड न भरल्यास पून्हा 03 महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर, डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, निकेतन कदम, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमदपूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन किनगाव व त्यांचे लेखन पोलीस हवालदार शिवाजी तोपरपे यांनी तपासाचे कामकाज केले होते.



